लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलपंपांवर होत असलेल्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर ‘लातूर जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशन’च्या पदाधिका-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेतली. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचे असोसिएशनने स्पष्ट करत नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
यावेळी आशिष कामदार, एस. ए. वहाब, रफीक काझी, अक्षय चव्हाणे, मयूर पाटील अजय शाह, अमोल दाडगे, जकी खान कायमखानी, महेंद्र किनगावकर, मयूर पाटील, मेहुल कामदार यांची उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान असोसिएशनने रुग्णालयांतील जनरेटर, शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर, हार्वेस्टर यांसारख्या यंत्रांसाठी ‘कॅन’मधून डिझेल नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अनेक यंत्रे थेट पेट्रोलपंपावर आणणे शक्य नसल्याने हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. जिल्हाधिका-यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने शेती. हॉस्पिटल व अत्यावश्यक सेवेसाठी पीईएसओ अॅप्रुव्ह केलेल्या बॅरल, ड्रममध्ये डिझेल पुरवठा करण्याबाबत पेट्रोलपंप चालकांना सूचना दिल्या.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहन असोसिएशनने अध्यक्ष कायमखानी यांनी केले आहे. यावेळी दारगे म्हणाले, १ मे महाराष्ट्र दिन आणि त्यानंतरच्या रविवारच्या सुट्ट्यांमुळे टँकर वाहतुकीत थोडा विलंब झाला होता. आता पुरवठा व्यवस्था पूर्ववत झाली असून नियमितपणे इंधन उपलब्ध होत आहे.
















