नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जानेवारी २०२५ मध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का बसू शकतो. महागाई भत्त्यात आजपर्यंतची सर्वात कमी म्हणजेच सुमारे ३ टक्के वाढ दिसण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात यावेळी गेल्या तीन वर्षांच्या काळातली सर्वात कमी वाढ ठरू शकते.
केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेते. सप्टेंबर २०२४ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ ते ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय कर्मचा-यांचा केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता ५४.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महागाई भत्ता किती मिळणार याची आकडेवारी अजून यायची आहे.
केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांसमोरील आव्हाने ओळखून ८० आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन देण्यात येते. लेबर ब्यूरोनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२४ पर्यंतचा महागाई भत्ता ५४.४९ टक्के झाला आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार, जानेवारी २०२५ मध्ये महागाई भत्ता केवळ ३ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
महागाई भत्त्याचा नवा कल
सध्याचा कल पाहता ऑक्टोबरचा डीए निर्देशांक १४३.६ पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता ५४.९६ टक्क्यांवर पोहोचेल. केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीत सहाव्या आणि ७ व्या वेतन आयोगात कर्मचा-यांना वाढ मिळाली होती.
३ टक्क्यांवर मानावे लागणार समाधान
डिसेंबर २०२४ पर्यंत, निर्देशांकात १४४.६ अंकांचा कल दिसतो आहे. अशा परिस्थितीत, महागाई भत्ता ५५.९१% राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचा-यांना पुन्हा एकदा केवळ ३ टक्क्यांवरच समाधान मानावे लागणार असे दिसत आहे. त्यामुळे नवीन वर्षात केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यांच्या अपेक्षेला धक्का बसू शकतो.