24.8 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रपेपरफुटी रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक

पेपरफुटी रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक

३ ते ५ वर्षांची शिक्षा, १० लाखांच्या दंडाची तरतूद

मुंबई : प्रतिनिधी
शासकीय नोकर भरतीसाठी होणा-या परीक्षांमध्ये वारंवार होणा-या पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणा-या कायद्याचे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. प्रस्तावित कायद्यात ३ ते ५ वर्षापर्यंत कारावास आणि १० लाख रुपयांचा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात शासकीय नोकर भरतीसाठी होणा-या परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम’ हा कायदा आणला जात आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत हे विधेयक मांडले. गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, सर्वांना शिक्षण व रोजगारात समान संधी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वाची असते. या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्यावर अनेकदा परीक्षा रद्द होतात. त्याचे परिणाम प्रामाणिकपणे परीक्षा देणा-या युवकांना भोगावे लागतात. भरतीला विलंब होतो. परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासठी, दोषी लोकांवर, पेपर फोडणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. काही राज्यांनी आणि केंद्र सरकारने यासाठी कायदे केले आहेत. महाराष्ट्रानेही असा कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. याच अधिवेशनात हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

प्रस्तावित कायद्यातील तरतुदीनुसार प्रश्नपत्रिका किंवा त्याचा कोणताही भाग फोडणे, कॉपी करणे किंवा अन्य गैरप्रकार केल्याचे आढळल्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या व्यक्तीस ३ ते ५ वर्षापर्यंत कारावास आणि १० लाख रुपयांचा दंड
अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

परीक्षा घेणा-या
संस्थेवरही कारवाई
परीक्षा घेणारी संस्था किंवा सेवा पुरवठादार दोषी आढळल्यास १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची व परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूद कायद्यात आहे. सेवा पुरवठादारास ४ वर्षांसाठी ‘ब्लॅक लिस्ट’ करून कोणतीही स्पर्धा परीक्षा घेण्यापासून प्रतिबंध केला जाईल.

संघटित गुन्हा केल्यास
मालमत्ता जप्त होणार
संस्थेच्या संचालक, व्यवस्थापकास ३ वर्ष ते १० वर्षापर्यंत कारावास आणि १ कोटी रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद विधेयकात आहे. संघटित गुन्हा केल्याचे आढळल्यास ५ ते १० वर्षांपर्यंत कारावास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR