पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि सुव्यवस्थित व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी प्रीमिनेंट एजुकेशन अँण्ड रिसर्च असोसिएशन (पेरा) या खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने एक उच्चस्तरीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात येत आहे. राज्य खासगी विद्यापीठांचे सक्षमीकरण, उत्कृष्टतेसाठी कार्यप्रणाली सुव्यवस्थित करणे हा त्याचा हेतू असून परिषदेचे आयोजन ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता श्री बालाजी विद्यापीठ, पुणे येथे करण्यात आले आहे.
नविन शैक्षणिक धोरणाला अनुसरून प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करणे, प्रमाणपत्रे गतीमान पद्धतीने मिळणे, आर्थिक व्यवस्थापन आणि शैक्षणिक मूल्यमापनात होणारा विलंब टाळणे, यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, त्या माध्यमातून खासगी विद्यापीठांसमोरील समस्यांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. या परिषदेच्या प्रमुख मान्यवरांमध्ये मुख्य अतिथी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विशेष अतिथी प्रा. (डॉ.) मंगेश कराड तसेच मुख्य वक्ते डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा समावेश असेल.
या परिषदेच्या माध्यमातून विविध विद्यापीठांचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आणि धोरणकर्ते कार्यप्रणालीतील अडथळे कसे दूर करता येतील, यावर विचारमंथन करणार आहेत, अशी माहिती श्री बालाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. गंगाधर शिरुडे, पेराचे सीईओ डॉ. हणुमंत पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
कार्यक्षमतेत वाढ आणि पारदर्शकतेवर भर या परिषदेत स्वयंचलन, डिजिटल प्रणालींचे एकत्रीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यापीठांची कार्यप्रणाली अधिक सक्षम कशी बनवता येईल, यावर सखोल चर्चा होणार आहे. ही परिषद महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांना विद्यार्थी आणि पालकांसाठी दर्जेदार सेवा पुरविण्यास मदत करेल तसेच शैक्षणिक आणि प्रशासकीय उत्कृष्टतेसाठी आवश्यक सुधारणा घडवून आणेल. या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण प्रणाली अधिक प्रभावी आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती पेराचे अध्यक्ष प्रा. डॉ.मंगेश कराड यांनी दिली.