सांगली : प्रतिनिधी
राज्यात २९ महापालिकांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. येत्या १५ जानेवारीला निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी निवडणुकांचे प्रचार सुरु असून उद्या या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. असे असले तरी पक्षापक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरूच आहे. अशातच आता सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला.यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडीचे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून देखील गेले.
निवडणूक काळात आचारसहिंता लागू असल्याने पैसे वाटणं किंवा मतदाराला कोणत्याही वस्तूंचे प्रलोभन दाखवण गुन्हा आहे. तरीही निवडणुकांच्या प्रचारादरम्यान गुप्तपद्धतीने पैसे वाटप सरार्स सुरु असते. ही एक लाजिरवाणी बाब आहे. मतदाराला विकत घेणं हा प्रकार सध्याच्या राजकारणातील ट्रेंड झाला आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत भाजपकडून ३००० हजारांची पाकीट वाटप करताना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले होते.
त्यानंतर आता सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग २० मधून निवडणूक लढवत असून त्यांच्याकडुन निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराकडून करण्यात आला आहे. त्यानंतर मिरजेतल्या जवाहर चौक येथील आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वादावादीचा प्रकार घडला,त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
यावेळी आमदार इद्रिस नायकवडी देखील उपस्थित होते. तर या वादावादी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार देखील घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले.

