संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वाच्या निर्णय देत घटस्फोट आणि पोटगीच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक करणा-या महिलेचा जामीन अर्ज फेटाळला.
आरोपी महिलेने सुरुवातीला पोटगी मिळावी यासाठी गुन्हा दाखल केला. मात्र, तडजोड केल्यानंतर तिने गुन्हा मागे घेतला असा आरोप तिच्यावर करण्यात आला. लताबाई जाधव व त्यांच्या दोन वकिलांवर सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव यांनी सुनावणीला उशीर झाल्याचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालय आणि दंडाधिकारी न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली होती.
ही सुनावणी करताना न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांच्या खंडपीठाने सांगितले की, सुनावणीला थोडा विलंब झाला आहे आणि त्यामुळे ट्रायल कोर्ट आता लवकरात लवकर सुनावणी घेईल अशी अपेक्षा आहे. याचिका दाखल करणा-या महिलेचा भूतकाळही चांगला नसल्याचे पुराव्यांच्या आधारे दिसत आहे. अशा स्थितीत जामीन मिळाल्यानंतर ती फरार होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
न्यायमूर्ती मेहर म्हणाले, असे दिसते की, या खटल्याचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी ट्रायल कोर्ट सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. खटला लवकरात लवकर निकाली काढता यावा यासाठी संबंधित सर्व पक्षकारांनी न्यायालयाला सहकार्य केले पाहिजे.
जाधव यांना मी कधीच भेटलो नसल्याचा दावा एका व्यक्तीने केला असून जाधव यांनी त्यांच्या दोन वकिलांसह अन्य तीन जणांवरही असाच गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले. दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाबाहेर समझोता झाला आणि त्यानंतर खटला मागे घेण्यात आल्याचे त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, ही सर्व प्रकरणे एकसारखीच होती. या खटल्यातील व्यक्तीच्या याचिकेनंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आलेल्या अहवालात ही महिला वकिलांना बरोबर घेत लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायची आणि नंतर कोर्टाबाहेर सेटलमेंट करून केस मागे घ्यायची.