पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील मनाला सुन्न करणारी बाब म्हणजे ज्यांच्याकडे आपण रक्षक म्हणून पाहतो त्या पोलिसाकडूनच हा घृणास्पद प्रकार घडला आहे.
लोणावळ्याच्या पोलिसाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकच भक्षक बनला आहे. एका पोलिस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. पोलिसाने केलेल्या या घृणास्पद प्रकाराचा तीव्र निषेध केला जात आहे.
कर्तव्यावर असताना हा पोलिस दारूच्या नशेत होता, याच नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार नाताळच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी घडला आहे.
नाताळची सुटी असल्याने पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलिस सस्ते तिथे बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून त्याने भाकरी घेतली अन् जेवण केले. त्याच भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता.
त्यावेळी तिथे पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला अन् चिमुकलीसोबत अश्लील चाळे करू लागला. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असे तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला अन् या नराधम पोलिस सस्तेचे बिंग फुटले. ज्या लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.