34.7 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिस उपनिरीक्षक कासलेनंतर हवालदार, चालकही निलंबित

पोलिस उपनिरीक्षक कासलेनंतर हवालदार, चालकही निलंबित

गुजरातमध्ये करोडोंची डील; पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांचा दणका

बीड : बीडच्या सायबर विभागातील पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्यानंतर आणखी दोन पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी चुकीचे काम करणा-यांना दणका दिला आहे. यामुळे ठाणेदारही अडचणीत आले असून, कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.

परवानगी न घेता आरोपी घेऊन गुजरातमध्ये गेले. तेथे गेल्यावर कोट्यवधी रुपयांची डील केल्याचा आरोप झाला. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्यासोबत गेलेले पोलिस हवालदार रामदास गिरी आणि चालक बळिराम भाग्यवंत यांना निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले, हवालदार रामदास गिरी आणि चालक बळिराम भाग्यवंत हे तिघे जण खासगी वाहनाने आरोपीला घेऊन गुजरात राज्यात गेले. त्याआधी त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत कांवत अथवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची परवानगी घेतली नाही. तसेच गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केली. त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या प्रकरणात पोलिस अधीक्षक कांवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी चौकशी करून रणजित कासले यांना तडकाफडकी निलंबित केले होते, तर गिरी आणि चालक भाग्यवंत यांची चौकशी केजचे सहायक अधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे सुरू होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान, यानंतर आता सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांचीही चौकशी झाली असून त्यांच्यावरही निलंबनाची टांगती तलवार आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिका-यांना विभागातील ठाणेप्रमुखाचा अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दिली आहे. त्यांच्यावरही गंभीर आरोप असल्याचे सूत्रांनी सांगितले जात आहे. आता आयजी हे गात यांच्यावर कारवाई करतात की पाठीशी घालतात? याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR