लातूर : प्रतिनिधी
शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या पौष्टीक ड्रायफ्रुटच्या मागणीत गतवर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती किरकोळ व्यापारी सादिक बागवान यांनी दिली. वाढत्या थंडीमुळे ड्रायफ्रुटची मागणी वाढली तसे दरही वाढले आहेत. शहरातील किरकोळ बाजारात काही दिवसापांसून काजू, बदाम, अक्रोडच्या मागणीत वाढ झाली आहे.
सध्या बाजारात कोल्हापूर, मंगळुरु, गोवा, केरळ येथून काजूची आवक होत आहे तर बदामाची आवक अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून होत आहे. तसेच इराणमधील मॉमेरोन जातीच्या बदामाची आवक होत आहे. काजूच्या नवीन हंगामाची सुरुवात झाली असून त्याला मागणीही चांगली आहे. त्याच बरोबर अक्रोडची आवक दक्षिण अमेरिकेतील चिलीतून होत आहे. अमेरिकेतून अक्रोडची आवक होत असली तरी चिलीच्या अक्रोडची प्रतवारीही चांगली आहे.
पुढील काही दिवसांत काश्मीरमधील अक्रोडचा हंगाम सुरू होईल. गतवर्षाप्रमाणे थंडीत ड्रायफ्रुटच्या मागणीत वाढ होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत ड्रायफ्रुटला चांगली मागणी राहते, असेही त्यांनी सांगितले. हिवाळयात आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारवरही लक्ष केंद्रीत केले जाते. हिवाळा या मोसमात जीममध्ये जाणा-यांची संख्या वाढत असते. व्यायामासोबत पोषक असा आहार घेण्यासाठी डिंक, शेंगदाणे आदींपासून तयार केलेले लाडूंचा वापरही मोठया प्रमाणात केला जातो. हे पदार्थ बनविण्यासाठी ड्रायफ्रुट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ता, खारिक, खोबरे आदींना प्रचंड मागणी असते. गतवर्षाच्या तूलनेत यंदा थंडीची लाट वाढत जात आहे. त्याच प्रमाणे ड्रायफ्रुटच्या मागणीत वाढ होत असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
हिवाळा ऋतूतील हवामान पचन शक्तीसाठी पुरक असल्याने अनेक नागरिक आरोग्यासाठी ड्रायफ्रुट खातात. यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पस्तिा, खारिक, खजूर, मनुका असे अनेक पदार्थ असतात. गत महिनाभरात ड्रायफ्रुट आणि पौष्टिक लाडूंच्या मागणीत दुपटीने वाढ झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले आहे. दीपावलीपासून थंडीला सुरुवात झाल्याने या थंडीच्या दिवसांत शरीरासाठी पौष्टिक पदार्थ खावेत, असा सला डॉक्टरही देत असतात. महिनाभरापासून लातूर बाजारपेठेत विविध प्रकारचे ड्रायफ्रुट तसेच डिंकाचे लाडू, काजू, किसमीस, खजूर, खारीक, खोबरे, मनुका यांची आवक मोठया प्रमाणात होत आहे.