पुणे : प्रतिनिधी
एकाची हत्या झाली त्याच भागात त्यानंतर घडलेला हा प्रकार चिंताजनक आहे. राज्य सरकारने विशेषत: मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने बघायला हवे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणी दिली आहे.
दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूहल्ला झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. आता विरोधकांनी सत्ताधा-यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शरद पवार यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची दखल घेण्याचा सल्ला दिला आहे. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या टीमकडून एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आले.
यामध्ये सांगितले आहे की, सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी रात्री २.३० वाजता चोर शिरल्याचे लक्षात आले. घरामधील मोलकरणीची त्याच्याशी झटापट सुरू झाली. तिचा आवाज ऐकून सैफ अली खान तिथे आला आणि त्याचीही चोरासोबत झटापट झाली. यावेळी चोराने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर दुखापत झाली आहे.
यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. लीलावती रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर ६ वेळा वार करण्यात आले. यावेळी त्याला दोन खोल जखमा असून यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ आहे. तर दुसरी मानेजवळ आहे. या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर, डाव्या मनगटावर आणि छातीवर जखमा झाल्या आहेत.
विरोधकांचा निशाणा
आधी सलमान खानच्या वांद्रेतील घरावर गोळीबार, त्यानंतर नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अधिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला यावर आता विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
खासदार सुळेंकडून फोनवर चौकशी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सदर प्रकरणावर भाष्य करत सत्ताधा-यांवर निशाणा साधला आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी पहिले सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी करीना कपूरची बहीण करिष्मा कपूरला फोन करत माहिती घेतली होती.
कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे : वर्षा गायकवाड
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘ही दुर्दैवी घटना असून महाराष्ट्रात आणि मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.