28.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeराष्ट्रीय‘प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

‘प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यात अमेरिकी अद्ययावत लढाऊ विमानांची चर्चा झाली, तर थोड्याच दिवसांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौ-यावर येणार आहेत. यावेळी भारताचा आतापर्यंतचा सर्वात विश्वासू संरक्षण साथीदार राहिलेल्या रशियासोबत मोठी डील होण्याची शक्यता आहे. अशातच मार्च एंडिंगपूर्वी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ समितीने १५६ एलसीएच प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. संरक्षण अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्रालयाने या आर्थिक वर्षात २.०९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे करार केले आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असेल असे सांगितले जात आहे. तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीची देखील मोठी जबाबदारी ‘एचएएल’वर आली आहे. अमेरिकेने इंजिन देण्यास विलंब केल्याने तेजस विमानांची निर्मिती थांबली होती. दोन दिवसांपूर्वीच पहिले इंजिन आले आहे. अशातच ‘एचएएल’ला आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.

हेलिकॉप्टरची निर्मिती सरकारी कंपनीच्या कर्नाटकातील बेंगळुरू आणि तुमकूर येथील प्लांटमध्ये केली जाणार आहे. प्रचंड हे हलके हेलिकॉप्टर असले तरी त्याची किर्ती महान आहे. उंच भागात शत्रूचे रणगाडे, बंकर, ड्रोन नष्ट करण्यास सक्षम आहे. मजबूत चिलखत संरक्षण आणि रात्री हल्ला करण्याची क्षमता आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्येही ते काम करण्यास सक्षम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR