27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रप्रचार संपल्याने कार्यकर्त्यांचा भर सोशल मीडियावर

प्रचार संपल्याने कार्यकर्त्यांचा भर सोशल मीडियावर

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेरी, बाईक रॅली काढून आपापल्या मतदारसंघात जोरदार प्रदर्शन केले. मतदानाचा दिवस बुधवार आहे. तोपर्यंत नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आता सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे.

प्रत्येक कार्यकर्ता, उमेदवारांचे स्नेही समाजमाध्यमांवर सक्रिय झाला आहे. त्यासोबत आता काही ठिकाणी हाऊसिंग सोसायटीच्या गच्चीवर उमेदवार छुप्या मीटिंग घेत प्रमुख पदाधिका-यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांना कार्यरत राहण्यासाठी सांगतिले जात आहे. विरोधी उमेदवारावर नकारात्मक प्रतिक्रिया आणि टिंगल-टवाळी करणारे मिम्स बनविले जात आहेत. जुन्या अडचणीतील प्रसंगाचा आधार घेत त्यांना नामोहरम केले जात आहे.
आपल्याच उमेदवाराला मत मिळावे, यासाठी कार्यकर्ते फिल्डिंग लावून सोशल मीडियावर वेगवेगळ्या युक्त्या लढवित आहेत.

मतदारांना मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर काढण्यासाठी बूथनिहाय नियोजन सुरू आहे. पोलिंग एजंटने कोणती भूमिका पार पाडायची याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी जागोजागी लावण्यात येणा-या टेबलची जबाबदारी वरिष्ठ कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे.

शेवटच्या टप्प्यात प्रचार करण्यासाठी हाऊसिंग सोसायटी, चाळीतील प्रमुख व्यक्ती याच्या गाठीभेटी घेण्याचा सिलसिला सध्या सुरू आहे. त्यांच्यासोबत त्या इमारतीच्या गच्चीवर, चाळीतील कुणाच्या खोलीत मिळेल त्या जागेत सध्या भेटी घेतल्या जात आहेत.

सोशल मीडियावर पाठविता येईल असे साहित्य उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते सोसायटीमधील प्रमुख लोकांना देत आहे. त्यांनी ते सोसायटीच्या ग्रुपवर पाठवावे असे सांगितले जात आहे. प्रत्येक उमेदवार सध्या या अशा पद्धतीने प्रचार करण्यात गुंतला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रचार सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR