बुलडाणा : मलकापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेसंदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सभेला हजर राहण्यासाठी चक्क शासकीय सेवेत असलेल्या आशा गटप्रवर्तकानेच तालुक्यातील आशा व अंगणवाडी सेविकांना या प्रचार सभेला हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आता समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवरून हा आदेश पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, अजितदादांच्या या सभेला अनेक आशा व अंगणवाडी सेविका हजर राहिल्या आणि त्याही चक्क गणवेशात. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते उच्चपदस्थ नेतेही निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त असल्याचे दिसत आहे. अशातच काल दुसरीकडे याबाबत आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी आम्हालाच आमच्या गटप्रवर्तकाने व्हॉट्सअॅपद्वारे संदेश देऊन अजित दादांच्या प्रचार सभेला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आम्ही या प्रचार सभेला हजर आहोत, असे सांगितले. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिका-यांना माहिती देण्यात आली. मात्र अद्याप निवडणूक विभागाकडून या शासकीय कर्मचा-यांवर किंवा गटप्रवर्तकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा हा भंग मानला जात असल्याने आश्चर्य वाटत आहे.
सेविका, मदतनीसाने मुलांना अंगणवाडीत कोंडले
आयटी हिंजवडीत धक्कादायक घटना घडली आहे. वीस लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा प्रताप समोर आला आहे. व्हीडीओत मुले अक्षरश: रडत असल्याचे दिसून येत आहे. हे पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केला आहे. ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावले म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगणवाडीला कुलूप लावले, असा खुलासा या दोघींनी केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला.

