पुणे : प्रत्येक कवीचा एक प्रकृतीधर्म असतो. हा प्रकृतीधर्म कवीच्या दैनंदिन कामकाजाशी समन्वय साधत वाटचाल करत असल्याने कवीच्या लिखाणात त्याच्या प्रकृतीधर्मानुसार कविता शब्दांतून आकार घेत असते, असे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी सांगितले.
निमित्त होते काव्यसंग्रहाचे प्रकाशन. कवी शरद शेजवळ यांच्या ‘शब्ददव’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजन लाखे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. लाखे म्हणाले की, शेजवळ यांचा स्वभाव कष्टाचा असल्याने आणि कामगारवर्गाशी संबंधित असल्याने एकता, एकात्मता, कामगार अशा विविध विषयांवरील कविता त्यांच्या लेखणीतून साकार झाल्या आहेत, जी समाजासाठी महत्त्वाची बाब आहे.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रतिमा इंगोले, प्रमुख अतिथी शिरीष चिटणीस, बंडा जोशी, प्रकाशक अविनाश काळे होते. वंदना इन्नानी यांनी केलेल्या ईशस्तवनाने सुरुवात झाली. इंगोले म्हणाल्या, शेजवळ हे येरवडा प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करत असताना त्यांनी कामगार, संघटना या विषयावर कविता लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी चिटणीस, जोशी व काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दिनेश भोसले यांनी काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. शेजवळ यांनी प्रास्ताविक केले, तर सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले.