मुंबई : कुणाल कामराच्या वादग्रस्त विनोदावर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी मौन सोडले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओमध्ये केलेल्या तोडफोडीच्या घटनेवर शिंदे म्हणाले की, समोरच्या व्यक्तीनेही एक पातळी राखली पाहिजे अन्यथा प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामराच्या वादग्रस्त विनोदावर बोलताना कुणाल कामराला खडे बोल सुनावले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही मर्यादा असायला हवी. आम्हाला व्यंगदेखील समजते, पण त्यालाही एक मर्यादा असायला हवी. हे एखाद्याविरुद्ध बोलण्यासाठी ‘सुपारी’ घेण्यासारखे आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओमध्ये केलेल्या तोडफोडीच्या घटनेवर शिंदे म्हणाले की, समोरच्या व्यक्तीनेही एक पातळी राखली पाहिजे अन्यथा प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते.
मी तोडफोडीचे समर्थन करत नाही
ते पुढे म्हणाले, या व्यक्तीने (कामरा) सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, पत्रकार आणि काही उद्योगपतींवरही भाष्य केले होते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. जणू काही तुम्ही कोणासाठी तरी काम करीत आहात, असेच यातून स्पष्ट होत असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली. मी यावर जास्त बोलणार नाही. मी तोडफोडीचे समर्थन करत नाही, असेही उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा विकास आणि कल्याणकारी योजनांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दिला.