19.5 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeमहाराष्ट्रप्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष

प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. नागरिकांना या सेवा त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय २२ जानेवारी २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येईल. यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सुलभ व पेपरलेस होत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णत: पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणा-या खर्चाकरिता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात असंख्य अर्ज प्राप्त होतात. रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली एकत्रित जोडण्यात येणार आहेत.
राज्यांतील गरजू रुग्णांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणा-या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून शासनाच्या इतर योजनेस समाविष्ट असलेले आजार वगळण्यात येणार आहेत. उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून अर्थसाहाय्याच्या रकमेचादेखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे, असे नाईक म्हणाले.
दुर्धर आजारावर
मिळते अर्थसहाय्य
दुर्धर आणि महागड्या आजारांवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळते. रुग्णांच्या उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. यामुळे हा उपक्रम केवळ आर्थिक सहाय्याचा स्त्रोत न राहता गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR