लातूर : प्रतिनिधी
मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे हजार वर्षांनंतर पुन्हा सापडलेले पवित्र अवशेष प्रथमच औसा रोडवरील कस्तुराई मंगल कार्यालय येथे सोमवार दि. १४ एप्रिल पासून दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. त्यामुळे एक अद्वितीय आणि ऐतिहासिक क्षण लातूर शहर अनुभवणार आहेत. आंतरराष्ट्रीय आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक दर्शक हाथी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार असून, यामध्ये प्राचीन वैदिक विधी रुद्रपूजेचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ७ रुद्ररूपात भगवान शिवाची स्तुती आणि पूजा करण्यात येणारा हा विधी, कालातीत मंत्रांनी परिपूर्ण असेल. या पवित्र अवशेषांचे लिंगरूपात पूजन करण्यात येणार असून, रुद्रपूजेदरम्यान त्यांचे पूर्ण श्रद्धा आणि सन्मानाने पूजन केले जाईल.
या पवित्र अवशेषांचे संरक्षण, इ.स. १०२६ मध्ये सोमनाथ मंदिर पडल्यापासून, अग्निहोत्री ब्राह्मणांनी पिढ्यान्पिढ्या केले आहे. या अवशेषांमध्ये अशी एक विलक्षण शक्ती आहे, जी विज्ञानालाही पूर्णपणे उलगडता आलेली नाही. २००७ मध्ये झालेल्या एका भूवैज्ञानिक अभ्यासात असे दिसून आले की, या अवशेषांच्या केंद्रभागी एक असामान्य चुंबकीय क्षेत्र आहे, जे पृथ्वीवरील कोणत्याही ज्ञात घटकांपासून बनलेले नाही. हे अवशेष त्या ज्योतिर्लिंगाचा भाग होते, जे जमिनीपासून दोन फूट उंच हवेत स्थिर होत असे. काळाच्या ओघात हे पवित्र अवशेष अग्निहोत्री ब्राह्मण पंडित सीताराम शास्त्री यांच्या कुटुंबाच्या संरक्षणात आले. शास्त्रीजींनी या अवशेषांबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी आदरणीय कांची शंकराचार्यांचा सल्ला घेतला. तेव्हा शंकराचार्यांनी सांगितले, तुम्ही हे पवित्र अवशेष बंगलोर येथे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याकडे घेऊन जा. तेच यांना योग्य स्थान मिळवून देतील. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या आशीर्वादाने, कधी काळी काळाच्या आणि अत्याचाराच्या गर्तेत हरवले गेलेले मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे हे पवित्र अवशेष आता सर्वसामान्य भक्तांसाठी दर्शनार्थ उपलब्ध करून देण्यात येत आहेत.