नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफ वाढवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ५० टक्के कर लादला आहे. हा कर वाढवण्यामागे भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचे कारण असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी कर वाढवूनही भारताने अजूनही माघार घेतलेली नाही. भारताने रशियाकडून तेल आयात करणे सुरूच ठेवले आहे.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबणार नाही. भारत सरकार अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, असं मत भारतीय तेल कंपन्यांचे आहे. पहिले देश, नंतर व्यापार असे अधिका-यांचा स्पष्ट संदेश आहे. रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा कोणताही आदेश सरकारकडून मिळालेला नाही, असे तेल कंपन्यांच्या अधिका-यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात ऑर्डर निश्चितच थोड्या कमी झाल्या आहेत, परंतु याचे कारण अमेरिकन टॅरिफ नाही तर रशियाकडून मिळालेली कमी सूट आहे.
गेल्या वर्षी, रशियन कच्चे तेल प्रति बॅरल २.५ डॉलर ते ३ डॉलरने स्वस्त उपलब्ध होते, पण आता ही सवलत फक्त १.५ डॉलर ते १.७ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. ऑक्टोबरपासून ऑर्डर पुन्हा वाढू शकतात, कारण रशिया पुन्हा सवलत वाढवण्याची तयारी करत आहे. सरकारचा संदेश स्पष्ट आहे की आम्ही झुकणार नाही. जर आता तेल आयात थांबवली तर अमेरिका अधिक अटी लादेल, असे एका अधिका-यांनी सांगितले आहे. जर भारताला हवे असेल तर ते इतर देशांकडून कच्चे तेल सहजपणे खरेदी करू शकतात, असा तेल उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांचा विश्वास आहे. पण असे करणे अमेरिकेच्या दबावापुढे झुकणे मानले जाईल.
म्हणूनच, सरकार सध्या हा पर्याय टाळू इच्छित आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे तात्काळ थांबवले तर जागतिक तेल बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. रशिया नंतर तेल दुस-या देशाला विकेल आणि भारत उर्वरित तेल खरेदी करेल. फक्त पुरवठा साखळी थोडी बदलेल. सध्या, भारतीय रिफायनरीज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांचे एकमेव लक्ष तेलाचा पुरेसा आणि सतत पुरवठा उपलब्ध आहे याची खात्री करणे आहे.