सोलापूर : शहरात धूळ मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्यात तर यात आणखी वाढ होते. यासोबतच आता वाहनांच्या धुराचाही त्रास सोलापूरकरांना सहन करावा लागत आहे. यामुळे सोलापूरचा एक्यूआय हा ८२ इतका झाला आहे.
रस्त्यावरील धुळीने सोलापूरकरांना नेहमीच त्रास होतो. यावर अजून तरी कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही. सतत उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनसंस्थेचे आजार होत आहेत. यात अस्थमासारख्या आजाराचाही समावेश आहे. रस्त्यावरील खड्डे, पाइपलाइन, इंटरनेटची वायर आदी टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात. यामुळेही धुळीत भर पडते. वाहनांच्या ये-जा यामुळे माती सारखी हवेत उडत राहते.
शहराचे क्षेत्रफळ मर्यादित असून गेल्या काही वर्षांत अनेक पटीने येथे नागरी वस्ती वाढली आहे. त्यानुसार वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. जुन्या आयुष्यमान संपलेल्या वाहनांपासून होणारे प्रदूषण तसेच पेट्रोल-डिझेलमधील भेसळ आणि त्यातून वाहनांमुळे वाढलेले प्रदूषण हवा बिघडविण्यास कारणीभूत ठरते. मात्र प्रशासनाकडून याबाबत कसलीही खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सोलापूर महापालिकेच्या बस सोलापुरातून धुराचे लोट वाहत जात असतात. बस इतका धूर सोडतात की इतर वाहने ५०० मीटर दुरुन जातात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या लोकांनाही याचा त्रास होत होता. धुराचा त्रास टाळण्यासाठी काही वाहने ओव्हरटेक करतात. प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा आराखडा तयार करणारी महापालिकेची बस प्रदूषण करत असल्याचे दिसून आले.सोलापूरचा एक्यूआय हा ८२ इतका आहे. एक्यूआय म्हणजे शहराची हवा समाधानकारक आहे. या हवेशी संपर्कात आलेल्या अस्थमा किंवा श्वसनसंबंधी आजार असलेल्या नागरिकांना याचा त्रास होतो. शहराच्या हवेत पीएम १० म्हणजे हवेतील सूक्ष्म धूलिकणांचा जास्त समावेश आहे.