लातूर : प्रतिनिधी
मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागा आणि त्याअंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. २०१७ च्या मतदार यादीनुसार ९ गटांची नावे बदलली गेली असून निलंगा तालुक्यात एक गट आणि दोन गण वाढले आहेत. निवडणूक लढवू इच्छिना-या गाव पुढा-यांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या जिल्हा परिषद व पंचायत समित्यावर साडेतीन वर्ष म्हणजेच मार्च २०२२ पासून प्रशासक राज आहे.
मिनी मंत्रालयाच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी अंतीम अधिसुचना जारी करण्यात आली आहे. २०१७ निवडणूकीत जे गट होते. त्या ९ गटांची नावे या प्रभाग रचनेत बदली आहेत. यात उदगीर तालुक्यातील तोंडार ऐवजी सोमनाथपूर गट झाला आहे. देवर्जन ऐवजी हेर, लातूर तालुक्यात महापूर ऐवजी आर्वी, बाभळगाव ऐवजी महाराणाप्रतापनगर, गाधवड ऐवजी तांदूळजा, औसा तालुक्यात हसेगाव ऐवजी लोदगा, निलंगा तालुक्यात शेडोळ ऐवजी दापका, कासार बालकुंदा ऐवजी तांबाळा असे गट जाहिर करण्यात आले आहेत. इतर गट मात्र पूर्वीप्रमाणेच कायम असणार आहेत. तसेच निलंगा तालुक्यात नव्याने लांबोटा हा गट वाढला आहे.
गेल्या साडेतीन वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यावर प्रशासक असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या अशा, अपेक्षा कोमेजल्या होत्या. मात्र प्रभाग रचनेची अंतिम अधिसुचना जारी होताच त्या-त्या मतदार संघातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तसेच जागेच्या आरक्षण सोडतीकडेही कार्यत्यांचे लक्ष लागले आहे. त्यानुसार निवडणूकीचे गणित जुळून येणार आहे. येत्या दोन-तीन महिण्यानंतर मंनी मंत्रालय समजल्या जाणा-या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी निवडणूक लागणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.