लंडन : वृत्तसंस्था
विज्ञानाच्या जगात एक मोठी क्रांती घडवणारे संशोधन समोर आले आहे. शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्स म्हणजेच मूळ पेशींपासून प्रयोगशाळेत मानवी उल्ब पिशवीची (ेंल्ल्रङ्म३्रू २ंू) एक प्रतिकृती यशस्वीपणे विकसित केली आहे. ही प्रतिकृती गर्भधारणेनंतरच्या पहिल्या दोन ते चार आठवड्यांतील नैसर्गिक उल्ब पिशवीसारखीच आहे.
‘सेल’या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, आतापर्यंत तयार करण्यात आलेले हे सर्वात प्रगत आणि परिपक्व मॉडेल आहे. या महत्त्वपूर्ण यशामुळे मानवी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यांबद्दलची अत्यंत मौल्यवान माहिती मिळण्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर भाजलेल्या त्वचेवरील उपचारांपासून ते कॉर्नियाच्या पुनर्रचनेपर्यंत अनेक वैद्यकीय प्रक्रियांसाठी आवश्यक पेशी उत्पादने तयार करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होऊ शकतो.
गर्भात वाढणारा भ्रूण एकटा नसतो. त्याच्या विकासाच्या प्रवासात त्याला अनेक ऊती मदत करत असतात. उल्ब पिशवी म्हणजे द्रवाने भरलेला एक प्रकारचा जैविक फुगा, जो वाढत्या भ्रूणाला धक्का आणि दुखापतींपासून वाचवतो. या पिशवीतील द्रव भ्रूणाच्या निरोगी विकासासाठी अत्यावश्यक मानला जातो; मात्र भ्रूण आणि त्याच्या सभोवतालच्या या संरचनेमधील गुंतागुंतीच्या संबंधांचा अभ्यास करणे आतापर्यंत खूप अवघड होते.
या संशोधनामुळे केवळ मानवी विकासाची गुपिते उलगडण्यास मदत होणार नाही, तर भविष्यात अनेक असाध्य आजारांवर नवीन उपचार पद्धती विकसित करण्याची क्षमताही यात दडलेली आहे. हे संशोधन भविष्यातील वैद्यकीय प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.