नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ असलेल्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. महामार्गावरील पोलिस चौकीजवळ उभ्या असलेल्या एसटी बसला मागून येणा-या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.यावेळेस या बसमधून १५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. या भीषण धडकेमुळे बस समोर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली आणि दोन अवजड वाहनांच्या मध्ये अक्षरश: चिरडली गेली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
हा अपघात इतका भयानक होता की, समोरच्या ट्रकचा १० ते १२ फुटांचा लोखंडी रॉड अँगल.बसचे लोखंडी पत्रे फाडून थेट केबिनमध्ये घुसला. यामुळे बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून चालक महेंद्र लांजा गावित यांचा पाय केबिनमध्ये अडकून पडला होता. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
अपघाताची माहिती मिळताच जामनपाडा सरपंच प्रियंका गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने आपल्या खासगी वाहनातून गंभीर जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले.

