चाकूर : प्रतिनिधी
चापोली येथे लातूर-नांदेड महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करीत लूट करून सोन्याचे दागीने व रोख रक्कम घेऊन फरार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांत भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी चाकूर येथील पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १७ डिंसेबर रोजीच्या पहाटेच्या अडीचच्या सुमारास चापोलीच्या उत्तरेस १० किलोमीटवर अनोळखी चार आरोपीनी संगणमत करुन फिर्यादी यादव किशन केंद्रे रा. माळहिप्परगा यांना व इतरांना लोखंडी रॉडने मारहाण करण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळील रोख ११००० रुपये, त्यांची बहीण शोभा गुट्टे यांचा एक जुना वापरातील मोबाईल किंमत ५००० रुपये व सोन्याचे दागिने २९. ग्राम, किंमत अंदाजे एक लाख ७८ रुपये व चांदीचे ५ तोळ्याचे दागीने किं. ५००० रुपये असा एकूण एक लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेऊन पसार झाले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन चाकूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुरनं व कलम ६६२/२०२५ कलम ३०९ (३),३(५) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोउपनि चामले हे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

