लातूर : प्रतिनिधी
आज दि. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असून लातूर मनपा शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरु आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या पावलाचे ठसे घेवून पालकांना आठवण म्हणून भेट देण्यात येणार आहेत. शाळांचा परिसर सजविण्यासोबत विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी,पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे नियोजन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.एकही विद्यार्थी शाळाबा राहणार नाही या दृष्टीने मनपा शिक्षण विभागामार्फत पाऊले उचलण्यात आली आहेत. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे व मनपा प्रशासनाच्या पुढाकाराने यावर्षी मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.मनपा शाळा क्र. ९ येथील इयत्ता नववी व दहावीचे वर्ग स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावर असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश,पाठ्यपुस्तके पुरविण्यात येत नाहीत. यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना मनपाच्या वतीने मोफत गणवेश, पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहेत.
लातूर शहरात मनपा संचलित मराठी माध्यमाच्या १३, उर्दू, सेमी इंग्रजी माध्यमाच्या ३ अशा एकूण १६ शाळा कार्यरत असून यात एक हायस्कूल आहे. या सर्व मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी शाळांना तोरण लावून, रांगोळी काढून, वार्डात प्रभातफेरी काढून मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांमार्फत स्वागत करण्यात येणार आहे. नवीन प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या पहिल्या पावलांचे ठसे घेऊन पालकांना आठवण म्हणून भेट देण्यात येणार आहेत. आयुक्त बाबासाहेब मनोहरे व उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्याकडून मनपा शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी भौतिक सुविधा व गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे लातूर शहरातील मनपा शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरुम्स, कृतीयुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्य शिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्त्तिक लक्ष दिले जात आहे.
सर्व मनपा शाळांमध्ये प्रशिक्षित व उच्च शिक्षित शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन, मोफत आरोग्य तपासणी, मोफत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, संगणक शिक्षण इत्यादी सुविधांचा लाभ दिला जात आहे. शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपल्या जवळच्या मनपा शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.