30.3 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रप्रशांत कोरटकर गृहखात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही

प्रशांत कोरटकर गृहखात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही

संजय राऊतांनी केला खळबळजनक दावा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महान नेतृत्व आहेत. संपूर्ण सरकारवर उपचार करण्याची गरज आहे. प्रशांत कोरटकर हा गृहखात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही, असा मोठा दावा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कोरटकर पळाला असेल, तर नागपूर पोलिस आयुक्तांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन नाकारण्यात आला आहे. त्यानंतर तो दुबईत पळून गेल्याची चर्चा रंगली आहे. कोरटकरचा दुबईतील एक फोटो व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावरून राऊतांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
फडणवीसांचे संपूर्ण सरकार मनोरुग्ण

संजय राऊत म्हणाले, ‘‘राज्याचे गृहखाते देवेंद्र फडणवीस सांभाळतात. जे देशाचे महान व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याइतके महान नेतृत्व अजून निर्माण झालेले नाही. प्रशांत कोरटकर हा नागपूरचा आहे. दंगल नागपूरला होते, दंगलीविषयी शंका व्यक्त करणा-याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘दंगल नागपूरला का झाली, असे बोलणा-यांवर मानसिक उपचार करण्याची गरज आहे,’ असे मी ऐकत होतो. पण, दंगल नागपूरला का झाली? हा माझा एकट्याचा प्रश्न नाही. फडणवीसांचे संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे. संपूर्ण सरकारवर मानसोपचार करण्याची गरज आहे.’’

कोरटकर भाजप किंवा ‘वर्षा’ बंगल्यावर सापडायचा
‘‘प्रशांत कोरटकर हा देवेंद्र फडणवीसांचाच माणूस आहे. तो पळून गेला की नाही, हे फडणवीस सांगतील. आम्ही म्हणायचो कोरटकर हा पळून गेला, उद्या तो भाजपच्या कार्यालयात, मंत्र्याच्या किंवा ‘वर्षा’ बंगल्यावर सापडायचा. खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल, तर गृहखात्याच्या मदतीशिवाय हे पलायन करू शकत नाही. फडणवीसांचे पोलिस सक्षम आहेत. आरोपींना पकडतात. ज्यांना पकडायचे नाही, त्यांना आदेशाशिवाय सोडून देतात. विरोधकांना बरोबर पकडतात,’’ अशी टीका राऊतांनी फडणवीसांवर केली आहे.

कोरटकर हा नागपूरमध्येच होता
‘‘कृष्णा आंधळे, कोरटकर आणि अजून भाजपचे काही आरोपी सापडत नाहीत. म्हणून मी म्हणतोय, सरकार मनोरुग्ण आहे. सरकारला उपचाराची गरज आहे. आरोग्य खात्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्यामुळे तिथे गोंधळ असल्याने झोळी फिरवून राज्यातील जनता सरकारवर उपचार करू शकते. तुम्ही नागपूर दंगलीतील आरोपी पकडले आहेत. मात्र, ज्याला खरोखर पकडायचा होता, तो पळून गेला आहे. कोरटकरला उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यावर तो नागपूरमध्येच होता. ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे. कोरटकर हा पळून गेला असेल, तर नागपूरच्या पोलिस आयुक्तांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची बदली करावी,’’ अशी मागणी राऊतांनी केली.

फडणवीसांचा पतंग फाटला आहे
कोरटकरप्रकरणी खरे म्हणजे गृहमंत्र्यांनी जबाब दिला पाहिजे. गृहमंत्री हवेत पतंग उडवतात. खरेतर त्यांचा पतंग फाटला आहे. ते कसले नागपुरात बसून पतंग उडवत आहेत,’’ असा संताप राऊतांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR