कोल्हापूर : प्रतिनिधी
इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणे आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा गुन्हा असलेला प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याला चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले. प्रशांत कोरटकर हा संपूर्ण वेळ वकिलांच्या युक्तिवादाकडे बारकाईने लक्ष ठेवून होता.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करणा-
या प्रशांत कोरटकर याला सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात अटक केली होती. त्यानंतर प्रशांत कोरटकर याच्या मुसक्या आवळून त्याला मंगळवारी सकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तर २५ मार्च रोजी सकाळी कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.
कोरटकर यांना पोलिसांनी कधीच व्हाईस सॅम्पल द्यायला बोलावलं नाही. सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले कोर्टाकडे मेल केले आहेत. कोरटकर यांचा व्हीडीओ आणि ऑडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला. तक्रारदार यांनी आधी ऑडिओ व्हायरल केला आणि संध्याकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. इंद्रजित सावंत यांनी आधीच पोलिसांत जायला हवे होते. मात्र, तसे न करता त्यांनी आधी प्रशांत कोरटकर यांचा ऑडिओ व्हायरल केला. यामागील फिर्यादीचा हेतू काय होता हे तपासावे लागेल, असे प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी म्हटले.
असीम सरोदेंचा जोरदार युक्तिवाद
यावेळी इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनीही न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. आरोपीला सहकार्य करणा-यांची चौकशी व्हावी. आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली. इंद्रजित सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात. तिथे अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचे काम करतात. इतिहास अभ्यासक ख-या अर्थाने कसे असतात हे इंद्रजित सावंत यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हीडीओ किंवा ऑडिओ काय असेल ऑडिओ क्लिप मी व्हायरल करणं हे शक्य नाही. ते व्यथीत झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना काही बोलले जाते, त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊ माँसाहेबांविषयी, त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोकसुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही, असे असीम सरोदे यांनी म्हटले.