लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील १० पंचायत समितीवर जवळपास चार वर्षे प्रशासक होते. या प्रशासकांनी मनमानी पध्दतीने विकास आराखडे तयार केले होते. विकास आराखडे तयार करताना केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी येणार असे ग्रहित धरून विकास आराखडे तयार केले होते. १५ व्या वित्त आयोगाचा चार वर्षांचा प्रलंबीत निधी नुकताच आला आहे. त्यामुळे १० ही पंचायत समितीच्या सभापतींनी गेल्या वर्षाच्या विकास आराखडयात बदल केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कामांची संख्या कमी-जास्त होऊ शकते.
लातूर जिल्हयातील १० पंचायत समितीवर मार्च २०२२ पासून ते २०२६ पर्यंत प्रशासक राज सुरू होते. पंचायत समितींच्या निवडणूका नुकत्याच पार पडून ११८ सदस्य निवडून आल्याने प्रशासक राज संपुष्ठात आले आहे. १० पंचायत समित्यांवर सभापती व उपसभापती यांची निवड पार पडून त्यांच्या नियमित मासीक बैठकाही सुरू झाल्या आहेत. प्रशासक काळात गटविकास अधिकारी तथा प्रशासक यांनी त्यांच्याकडे आलेल्या मागणीनुसार व गरजेनुसार अनेक कामे सुचवून सलग चार वर्षे विकास आराखडे तयार केले होते. मात्र या आराखडयात पंचायत समितीच्या कारभा-यांकडून बदल करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
पंचायत समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण हवे
जिल्हयात झालेल्या निवडणूकात जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचेही सदस्य निवडूण आले आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे यशदाचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. आगदी त्याच प्रमाणे लातूर पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचे यशदाकडून प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. जेणेकरून पंचायत समितीत प्रशासकीय कामकाज कसे चालते व करावे, आपल्या मतदार संघात कामे टाकत असताना ती कशी टाकावी आदी बाबींच्या संदर्भाने सदस्यांचे प्रशिक्षण होणे आवश्यक असल्याचे मत लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले यांनी व्यक्त केले.
६०-४० नुसार आराखडे बनवावे लागणार
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा चार वर्षाचा कोटयावधी रूपयांचा निधी नुकताच बंधीत व अबंधीत स्वरूपात १० पंचायत समितीच्या खात्यावर जमा झाला आहे. बंधीतच्या ६० टक्के निधी मधील ३० निधी हा स्वच्छता विषयक कामावर, ३० टक्के निधी पाणी पुरवठयाच्या कामावर खर्च करावा लागणार आहे. तसेच अबंधितचा ४० निधीपैकी १० टक्के निधी प्रशासकीय कामकाजावर खर्च करता येणार आहे. तर ३० टक्के निधी गरजेनुसार खर्च करता येणार आहे.
गणांची गरज पाहून कामे टाकली जाणार
प्रशासक कालावधीत प्रशासकांनी त्यांच्या सोईनुसार कामे टाकली होती. पंचायत समितीच्या गणात निवडणूक होऊन गणाचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य निवडूण आले आहेत. त्या-त्या सदस्यांच्या गणांची गरज पाहून आपण कामे टाकणार आहोत. विशेष म्हणजे कांही दिवसापूर्वी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटून प्रशासक काळात जे आराखडे बनवले ते चुकीचे आहेत. त्या गणात कामेच नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून सुचना घेवून कामे टाकण्यात येणार असल्याने गेल्या चार वर्षाच्या काळात जे विकास आराखडे बनवले, त्यात बदल केला जाणार असल्याची माहिती लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले यांनी सांगीतले.
















