25.4 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रप्रा. आशिष उटगे यांना पीएच.डी. प्रदान

प्रा. आशिष उटगे यांना पीएच.डी. प्रदान

पुणे : प्रतिनिधी
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रा. आशिष शिवकुमार उटगे यांना यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या प्रबंध संशोधनाचे शीर्षक ‘डिझाईन, डेव्हलपमेंट, अँड एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन ऑफ इन्व्हर्टर एअर कंडिशनर विथ अल्टरनेटिव्ह रेफ्रिजरंट्स’ होते.

डॉ. उटगे यांनी पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम एअर कंडिशनर क्षेत्रा मध्ये कमी ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल असलेल्या रेफ्रिजरंट्सच्या वापराच्या गरजेवर प्रकाश टाकला आहे. त्यांचा मुख्य उद्देश पर्यायी रेफ्रिजरंट्सच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करून, ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ करणे आणि एचव्हीएसी प्रणालींमुळे होणारा पर्यावरणीय प्रभाव कमी करणे हा होता. त्यांच्या प्रयोगांनी हे सिद्ध केले आहे की, आर-२९०, आर-१२७० आणि यांचे मिश्रण सारख्या रेफ्रिजरंट्समुळे ऊर्जा वापर कमी होऊन ए.सी. चे कार्यक्षमता वाढते.

डॉ. आशिष शिवकुमार उटगे हे मूळचे औसा येथील असून ते ११ वर्षांपासून ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’च्या यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.

‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’च्या विश्वशांती सभामंडप, लोणी काळभोर, पुणे येथे पार पडलेल्या दीक्षांत सोहळ्याला भारत सरकारचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या पदवीदान सोहळ्यात, विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे, भारत सरकारचे माजी प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. कृष्णस्वामी विजय राघवन यांना ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी महर्षी’ सन्मानाने गौरविण्यात आले.

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस, यांनी पीएच.डी. पदवी वितरणाची औपचारिक घोषणा केली, तर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष आणि युनेस्को चेअर होल्डर आदरणीय प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर यांनी दीक्षांत समारंभाचे उद्घाटन केले. त्यांनी त्यांच्या प्रेरणादायी भाषणात शैक्षणिक उत्कृष्टता आणि शांततापूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

समारंभात श्री. राहुल कराड, व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, यांनी मार्गदर्शनपर भाषण करत सर्व दीक्षांत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याचबरोबर, प्रख्यात आंतरराष्ट्रीय बिझनेस सल्लागार आणि लेखक प्रा. राम चरण यांना विशेष अतिथी म्हणून सन्मानित करण्यात आले व त्यांचे प्रेरणादायी भाषण झाले. समारोपात एमआयटी डब्ल्यूपीयूचे परीक्षा नियंत्रक डॉ. राहुल जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR