पुणे : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी लेखक, वक्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली असून सुनीताराजे पवार यांची कार्यवाह म्हणून तर कोषाध्यक्ष म्हणून विनोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. महामंडळाचे कार्यालय पुढील तीन वर्षांसाठी मुंबईमधून पुण्यात स्थलांतरित झाले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी यांच्यासह घटक, समाविष्ट व संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
साहित्य महामंडळाच्या मावळत्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी महामंडळाचे नूतन अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे महामंडळाचा कार्यभार सुपुर्द केला तसेच सर्व नूतन पदाधिका-यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पुढील तीन वर्षे साहित्य महामंडळाचे कामकाज पुण्यातून होणार आहे.९९, १०० आणि १०१ ही तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भरविण्याचा मान साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्याला आल्यामुळे पुणेकरांना मिळणार आहे.
वयाच्या ४३ व्या वर्षी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होण्याचा मान प्रा. मिलिंद जोशी यांना मिळाला. परिषदेच्या इतिहासातील ते सर्वांत तरुण कार्याध्यक्ष आहेत. वयाच्या ५३ व्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणारे प्रा. जोशी हे साहित्य महामंडळाच्या इतिहासातील सर्वांत तरुण आणि स्थापत्य अभियंता असणारे अध्यक्ष आहेत. प्रा. जोशी हे उत्तम लेखक असून त्यांची विविध वाङ्मय प्रकारात २१ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.