25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांकडून महाराष्ट्रात दडपशाही

फडणवीसांकडून महाराष्ट्रात दडपशाही

तासगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी आहे. ते गुजरातच्या नेत्यांना खूश करत आहेत. त्यांचे गृहखात्यावर लक्ष नाही. राज्यात दडपशाही वाढली आहे. त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्राचे धृतराष्ट्र आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी केला.

तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तासगाव शहरातून रॅली काढून सभा घेण्यात आली. यावेळी रोहित पवार बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, अनिता सगरे, सुरेश पाटील व स्मिता पाटील उपस्थित होते.

पवार म्हणाले, तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात दडपशाही सुरू आहे. विरोधकांचे मतदारांना फोन येत आहेत. बघतो, करतो अशा धमक्या येत आहेत. मात्र, लोकांनी या धमक्यांना घाबरून जाऊ नये. मतदारांनी विरोधकांचा लोकसभेला करेक्ट कार्यक्रम केला आहे. तसाच कार्यक्रम आता विधानसभेलाही करा. मतदारसंघात मलिदा गोळा करणारी, दडपशाही करणारी गँग तयार झाली आहे. मतदारसंघातील जमिनीचा ताबा घेणारी ही गँग नेस्तनाबूत करावी लागेल.

विरोधक रोहित पाटील यांना बच्चा समजत आहेत. मात्र, त्यांना बच्चा समजणारे स्वत: कच्चे आहेत. परंतु, आर. आर. पाटील यांचा छावा या निवडणुकीत उभा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा रोहितच्या रुपाने आर. आर. पाटील देण्याचे काम मतदारांनी करावे. मतदारसंघातील दडपशाहीला हद्दपार करावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.

मतदारसंघातील गुंडगिरी हद्दपार करणार : रोहित पाटील
आर. आर. पाटील यांनी राज्यातील गुंडगिरी हद्दपार केली होती. मात्र, आता तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात विरोधकांनी गुंडगिरी सुरू केली आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील विरोधकांची ही गुंडगिरी हद्दपार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा रोहित पाटील यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR