मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयामुळे एकनाथ शिंदेंना मोठे बळ मिळाले आहे. तर, सरकारमधील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकाराची देखील समान वाटणी करण्यात आली आहे. पूर्वी मंत्रालयातील विभागातील फायली थेट मुख्यमंत्र्यांकडे जात होत्या. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व विभागांना आदेश दिले आहेत की, फायली थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता आधी त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जातील, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील.
उपमुख्यमंत्री शिंदेंकडून फायली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील.
या निर्णयामुळे उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकाराची समान वाटणी केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना ताकद दिली असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना देखील धोरणात्मक निर्णयांच्या फायली आधी तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होत्या. त्यानंतर त्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंकडे जात होत्या. त्यामुळे प्रत्येक निर्णयात फडणवीसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत होती. तसेच काहीसे आत्ता एकनाथ शिंदेंच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री व्हावे लागले. त्यामुळे ते नवीन सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वत: शिंदे यांनी सरकारमध्ये कोणी नाराज नसल्याचे म्हटले होते. मात्र, ज्या फायली थेट उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे जात होत्या. त्या फायलींचा प्रवास आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे नंबर टू असणार आहेत का? याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.