मुंबई : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. याच निवडणुकीवर महाराष्ट्रातील विधानसभेचे गणित अवलंबून असणार आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीतच प्रचाराचा धडाका सुरू करणार आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यभर मॅरेथॉन दौरा सुरू करण्याचे ठरविले असून, रोज ३ सभा घेत जोरदार प्रचार करणार आहेत. यासंबंधी लवकरच वेळापत्रक जाहीर होईल, असे सांगण्यात आले.
केंद्रात नरेंद्र मोदींना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कारण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा जास्त म्हणजेच एकूण ४८ जागा आहेत. त्यामुळे राज्यातून अधिकाधिक जागा जिंकून देण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला आहे. त्यांनी आधीच मिशन ४५ चा निर्धार बोलून दाखविला आहे. त्यामुळे फडणवीस आतापासूनच कामाला लागले आहेत. आता ते फेब्रुवारीपासून महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत प्रचार करणार आहेत. त्यासाठी त्यांनी रोज तीन सभा घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
एकीकडे विरोधकांनी एकजुटीने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादीत फोडाफोडी करून महायुतीचे बळ वाढविल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता भाजपने एक पाऊल पुढे टाकत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी राज्य पिंजून काढण्याचे ठरविले आहे. त्यासाठी फडणवीस यांनी फेब्रुवारीत रोज ३ सभा घेणार आहेत.