24.6 C
Latur
Thursday, February 20, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीसांचा मंत्री तुमचा, अधिकारी माझा पॅटर्न!

फडणवीसांचा मंत्री तुमचा, अधिकारी माझा पॅटर्न!

मुंबई : प्रतिनिधी
सत्तास्थापना, खातेवाटप, पालकमंत्रिपद यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. त्यातच आता अधिका-यांच्या नियुक्त्यांवरून भाजपच्या मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री तुमचा, अधिकारी माझा पॅटर्नमुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्रिपद भूषवतानाही हेच मॉडेल वापरले होते. प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमुळे फडणवीस यांचाच शब्द अंतिम होता. आता पुन्हा एकदा तोच पॅटर्न दिसू लागला आहे. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता पसरली आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या टर्ममध्ये फडणवीस यांनी नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये वापरलेले मॉडेल वापरले. मोदींनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना प्रशासनावर वर्चस्व निर्माण केले. पुढे हेच मॉडेल गुजरात मॉडेल किंवा मोदी मॉडेल म्हणून ओळखले जाऊ लागले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही मोदी मॉडेलचा वापर सुरू आहे. या मॉडेलमुळे लोकप्रतिनिधी, मंत्र्यांपेक्षा अधिकारी अधिक शक्तिशाली होतात. एकाच पक्षाचे सरकार सत्तेत असते, त्यावेळी हे मॉडेल अधिक प्रभावी ठरते. पण युती, आघाडी सरकारमध्ये हे मॉडेल वादाचे ठरते. राज्यात आता तेच घडताना दिसत आहे.

२०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार होते. त्यावेळीही फडणवीस यांचे प्रशासनावर प्रचंड नियंत्रण होते. शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या मंत्रालयांमध्ये त्यांनी आपल्या विश्वासातील अधिकारी नेमले. माहिती आणि जनसंपर्कचे डीजीपद एका आयपीएस अधिका-याला देण्यात आले. विशेष म्हणजे या पदावर आतापर्यंत आयएएस अधिका-याची वर्णी लागत आलेली आहे. या पदावरील अधिका-याकडे माध्यमांमध्ये जाहिराती देण्याची जबाबदारी असते. सरकारकडून काढल्या जाणा-या प्रेस नोट याच अधिका-याच्या माध्यमातून जात असतात.

सरकारी अधिकारी आम्हाला गांभीर्याने घेत नाहीत, अशी तक्रार फडणवीस २०१४ ते २०१९ मध्ये मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे मंत्री करायचे. त्यांची नाराजी ऑफ द रेकॉर्ड बोलून दाखवायचे. अधिकारी व्यस्त असल्याचे सांगून आम्ही बोलावलेल्या बैठकांना येत नाहीत, अशा तक्रारी सेनेचे मंत्री करायचे. एकनाथ शिंदे आणि रविंद्र वायकर हे सेनेचे मंत्री याला अपवाद होते. याच कालावधीत शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. एका मंत्र्याने तर खिशातला राजीनामा माध्यमांना काढूनही दाखवला होता.

सेठींच्या नेमणुकीने
दिला पहिला धक्का
आताही फडणवीसांनी मोदी मॉडेल वापरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या संचालकपदी १९९२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजय सेठी यांची नेमणूक केली. हे पद कायम मंत्री किंवा लोकप्रतिनिधी भूषवत आलेला आहे. पण फडणवीसांनी तिथे आयएएस अधिकारी नेमत शिवसेनेला धक्का दिला. कारण परिवहन मंत्रालय शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्याकडे असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात.

ओएसडी, पीए, पीएस
नेमणुकीवही नियंत्रण
आयएएस, आयपीएस यांच्या नेमणुका, बदल्यांसोबतच मंत्र्यांचे पीए, पीएस, ओएसडी यांच्या नियुक्तीवरही फडणवीसांचे नियंत्रण आहे. त्यामुळे मित्रपक्षांची, विशेषत: शिवसेनेच्या मंत्र्यांची अस्वस्थता वाढली आहे. पीए, पीएस, ओएसडी नेमताना त्यांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. स्वच्छ प्रतिमा असलेल्यांनाच मंत्र्यांचे पीए, पीएस, ओएसडी म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. याची सूचना आधीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR