मुख्यमंत्री सहायत निधी कक्षातून शिंदेंचे विश्वासू चिवटेंना हटविले
मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल होऊ लागले आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यापूर्वी मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख होते. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत. मात्र, आता त्यांच्या जागेवर आता डॉ. नाईक यांची वर्णी लागली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची स्थापना केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे काम किती प्रभावीपणे होऊ शकते आणि त्याचा सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी किती फायदा होऊ शकतो, याची पहिल्यांदा प्रचिती आली होती. यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या पदावर काम करताना मंगेश चिवटे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा कारभार डॉ. रामेश्वर नाईक यांच्याकडे आला आहे.
कोण आहेत रामेश्वर नाईक?
डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१४ साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते. यानंतरच्या काळात त्यांनी काही धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम पाहिले. महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात डॉ. रामेश्वर नाईक यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती. रामेश्वर नाईक हे भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे विश्वासू समजले जातात.