24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांची भाषा गुंडगिरीची

फडणवीसांची भाषा गुंडगिरीची

‘ठोकून काढा’च्या वक्तव्यावरून राऊत, संभाजी ब्रिगेड संतापले

मुंबई : प्रतिनिधी
‘विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. ‘मैदानात उतरा आणि ठोकून काढा’ असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अधिवेशनात कार्यकर्त्यांना दिला. फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर संभाजी ब्रिग्रेड व ठाकरे गट आक्रमक झाले आहेत.अशी भाषा वापरून कार्यकर्त्यांना आदेश देताना फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत का? अशी विचारणा संभाजी बिग्रेडने केली आहे. तर ‘ठोकून काढा’ म्हणजे काय, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. या वक्तव्याबाबत फडणवीस यांनी माफी मागावी, अशी आक्रमक मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे अधिवेशन पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी या अधिवेशनात मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना फडणवीस यांनी आदेशाची वाट न पाहता, मैदानात उतरून ठोकून काढण्याचे आदेशा दिले. फडणवीस यांनी केलेल्या आवाहनावर ठाकरे गट व संभाजी बिग्रेड चांगलीच आक्रमक झाली आहे.
पुढे बोलताना ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘ठोकून काढा’ म्हणजे काय? फडणवीसांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. फडणवीस हे गुंडाची भाषा वापर आहेत, असे राऊत म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ठोकून काढण्याची भाषा करणा-या फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अमित शाह यांनीही राजीनामा द्यायला पाहिजे. दोन्ही गृहमंर्त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ठोकशाहीची भाषा काय असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ, असा इशारा राऊतांना दिला. अमित शाह हे व्यापारी नेता आहे. ते आपले गृहमंत्री आहे, हे सांगायला लाज वाटते. गुजरातच्या व्यापा-याला आम्ही महाराष्ट्र लूटू देणार नाही, असे राऊत म्हणाले.

भाजपने पैसे देऊन आणि ईडीच्या धमक्या देऊनच त्यांनी आमदार फोडले. देशाचा गृहमंत्री कसा नसावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांना एका राज्यातून तडीपार केले होते, असे सांगत राऊतांनी शाह यांच्याबाबत आपल्याला अधिक बोलायला लावू नका असे त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचारी गृहमंत्री कशाला?
महाविकास आघाडीचे जे आमदार फुटले त्यांना प्रत्येकी ५०, कोटी रुपये फडणवीस यांनी दिले. २० आमदार फोडल्याचे फडवणीस गर्वाने सांगत आहे. त्यांनी अटक करा. त्यांच्यावर ईडी-सीबीआयची चौकशी लावा. तुम्हाला भ्रष्टाचार नकोय तर भ्रष्टाचारी गृहमंत्री कशाला पाहिजेत , असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

राज्यात दंगली घडविणार का? : संभाजी ब्रिगेड
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेड जाहीर निषेध करत संभाजी बिग्रेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले, फडणवीस यांची भाषा गृहमंत्री पदाला शोभणारी नाही. कदाचित राज्याच्या गृहमंर्त्याला महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे? त्यासाठी दंगली घडविल्याशिवाय पर्याय नाही किंवा वाद घातल्याशिवाय पर्याय नाही असेच या वक्तव्यावरून कळते.‘ठोकून काढा’ म्हणणे म्हणजे गुंडगिरी दादागिरीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यांच्या या आवाहनामुळे त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत की काय? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR