मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकारण तापताना दिसत आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणा-या मनसेने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, दुसरीकडे भाजपाने निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघात मनसे आणि भाजपा आमनेसामने येणार का, याकडे लक्ष लागले होते. भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या मतदारसंघातून माघार घेण्याबाबत विनंती केली होती. अखेरीस राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
निरंजन डावखरे शिवतीर्थावर
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या निरंजन डावखरे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या निवडणुकीत महायुती एकत्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे महायुती एकत्र राहील, असा मला विश्वास आहे, असे निरंजन डावखरे यांनी सांगितले.