जालना : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला विश्वास आहे. ते आमच्या मागण्या मान्य करतील. आता त्यांनी दाखवून द्यायचे आहे की त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी प्रेम आहे की राग, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे केले आहे.
दरम्यान,
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या जुन्याच मागण्यांसाठी त्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच बीड येथील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे या नवीन मागणीचाही त्यांच्या आंदोलनात समावेश करण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा समाजानेही सामूहिक उपोषण सुरू केले आहे.
तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना दिलेला होता. त्यांनी त्यांचे हे वाक्य आज प्रत्यक्षात आणले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस हे सांगत होते की, आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांच्या आड येत नाही. आमची कोणतीही आडकाठी नाही, असे सांगत मनोज जरांगे म्हणाले की, विधानसभेत मराठा बांधवांनी यांना मतदान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास दाखवला आहे. आता त्यांची जबाबदारी आहे की, त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी प्रेम आहे की राग हे आता दिसून येईल. आताच मी काही बोलणार नाही, मात्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.