24.9 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeलातूरफळ, भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा द्या

फळ, भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा द्या

लातूर : प्रतिनिधी
अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केल्यामुळे विस्थापीत झालेल्या फळे व भाजीपाला विक्रेत्यांना त्वरीत पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, शहरात महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास योजना सुरूच ठेवावी, एसटीपी प्रकल्प तातडीने सुरू करावा आदी सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना केल्या आहेत.
लातूर शहरातील महानगरपालिका अंतर्गत विविध कामांच्या संदर्भाने आढावा घेताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना अनेक सूचना केल्या आहेत. यात  काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईमुळे विस्थापित झालेल्या लातूर शहरातील फळे व भाजी विक्रेत्यांना त्वरित पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात. लातूर शहरातून गटारात वाहून जाणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करणा-या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता सदरील प्रकल्प त्वरित सुरू करण्यात यावा.
महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास योजना सुरूच ठेवावी. महिला आणि विद्यार्थिनींना मोफत सिटी बस प्रवास योजना राबवणारी लातूर महानगरपालिका राज्यातील पहिली आणि एकमेव महानगरपालिका ठरलेली आहे.  सदरील योजना राबवताना येणा-या अडचणी शासन स्तरावरून  सोडवण्यात येतील. मात्र, ही योजना पुढेही कायम सुरू ठेवावी आदी सूचना आमदार देशमुख यांनी मनपा आयुक्तांना केल्या असून शहरातील कचरा व्यवस्थापन, रस्ते बांधकाम व दुरूस्ती, उद्यान, बगीचा यांचा विकास, शहरातील इतर बांधकामे शहर वाहतूक व्यवस्था या संदर्भानेही त्यांनी त्यांच्याकडून या प्रसंगी आढावा घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR