मुंबई : वृत्तसंस्था
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट येत्या ९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तो भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
दरम्यान, ‘अबीर गुलाल’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराची भूमिका असल्याने तो भारतात प्रदर्शित होण्याविरोधात मनसेची भूमिका आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे,’ असा थेट इशारा खोपकरांनी दिला आहे.
‘पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कच-यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावे लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार. ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे.
‘अबीर गुलाल’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्याला विविध चित्रपट संघटनांच्या रोषाला सामोरे जावे लागतेय. २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास किंवा परफॉर्म करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. तरीही अनेक राजकीय पक्ष आणि चित्रपट संघटना पाकिस्तानी कलाकारांचा विरोध करत आहेत. त्यामुळे भारतात फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही, यावर प्रश्न उपस्थित होतोय.