18.4 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeलातूरफिजिओथेरपी उपकरणांमुळे मानवी आजारांवर मात करणे शक्य

फिजिओथेरपी उपकरणांमुळे मानवी आजारांवर मात करणे शक्य

लातूर : प्रतिनिधी
मानवी जीवनाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे जीवन शैलीत अमुलाग्र बदल झालेले आहेत. जीवन शैलीतील बदलामुळे अनेक आव्हानात्मक व गुंतागुंतीचे आजार उत्पन्न होत आहेत. सध्या स्थितीतील रोगांचे वाढते प्रमाण लक्षात घेता परिणामकारक फिजिओथेरपी उपचार पध्दती व तज्ज्ञ यंत्रणेस अत्याधुनिक फिजिओथेरपी उपकरणांची जोड दिल्यास सर्व प्रकारच्या मानवी आजारांवर मात करणे शक्य आहे, असे मत पाँडिचेरी येथील मदर तेरेसा फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया विनोद नायर यांनी व्यक्त केले लातूर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरपी येथे आयोजित ‘प्रथम राष्ट्रीय इलेक्ट्रोकॉन २४’ परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, डॉ. गौरव भटनागर, डॉ. विरेंद्र मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मानवी आजारांचे वाढते प्रमाण आणि गुंतागुंतीवर आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील उपचाराबरोबर फिजिओथेरपी उपचार हे अत्यंत महत्वाचे ठरतात. अत्याधुनिक फिजिओथेरपी उपकरणांमुळे उपचारातील अचुकता वाढली असून ही उपकरणे उपचारात, पुनर्वसनात, सुधारणा घडवून आणण्यासाठी व उपचार कालावधी कमी करण्यासाठी मदतीची ठरत असल्याचे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. सुप्रिया नायर म्हणाल्या की, अत्याधुनिक वेदना व्यवस्थापन वैद्यकीय उपकरणे वेदनाशामक औषधांवरील अवलंबित्व्­ा कमी करण्यासाठी मदतीचे ठरत आहेत. वेदना ग्रस्त अवयवावर अशा उपकरणांच्या माध्यमातून उपचार करुन रुग्ण बरा होण्यास मदत होते. पॅरेलिसिस, मेंदूरोग, ह्रदयरोग, फुफ्फुसाचे रोग, दुखापत, अपघात अशा कारणांमुळे कमकुवत व अशक्त स्रायू असलेल्या रुग्णांमध्ये विशिष्ट उपकरणांव्दारे स्रायूंना उत्तेजित करण्यास मदत होते. वेदनेने ग्रासलेले अनेक रुग्ण समाजात आहेत. मात्र माहिती व जागृती अभावी हे रुग्ण उपचारापासून वंचित आहेत. अशा रुग्णांना फिजिओथेरपी उपचाराच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ. कराड म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात फिजिओथेरपी ही शाखा अतिशय महत्वाची असून या शाखेची गरज दिवसेंदिवस वाढत असून तरुणांना करिअरच्या दृष्टीकोनातून ही शाखा फायद्याची आहे. वैद्यकीय, आयुर्वेद या शाखांबरोबर फिजिओथेरपी शाखेची तीतकीच गरज आहे. लातूरात होत असलेली राज्यातील पहिली इलेक्ट्रोकॉन २४ राष्ट्रीय फिजिओथेरपी परिषद ही संशोधक, डॉक्टर व विद्यार्थ्यांच्या हिताची ठरेल. डॉ. भटनागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नेहा सिंग यांनी केले तर आभार डॉ. शितल घुले यांनी मानले. या परिषदेस देशभरातील फिजिओथेरपी विषयाचे ४०० प्राध्यापक, संशोधक, डॉक्टर, विद्यार्थी हे प्रत्यक्ष तर अभाशी माध्यमातून ९५६ जण उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी, डॉ. सिंगार वेलन, डॉ. रिषा कांबळे, डॉ. पवन कुमार, डॉ. शितल घुले, डॉ. झिशान मोहम्मद, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. प्रमोद गायसमुद्रे, डॉ. अनिल साठे, डॉ. सलीम शेख, डॉ. स्मिता मुंडे, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR