धुळे : फुगा फुगवताना ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील यशवंत नगरमधून समोर आली आहे. डिंपल मनोहर वानखेडे असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची धुळे शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील यशवंत नगर साक्री रोड येथे डिंपल आपल्या घराच्या अंगणात फुगा फुगवत असताना ही घटना घडली. फुगा फुगवत असताना तो अचानक फुटला आणि फुग्याचा तुकडा चिमुकलीच्या घशात अडकला.
फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. डिंपलला त्रास होतोय हे कळताच तिच्या घरच्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.