22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeधाराशिवफेरमतदान हे शासनाचे अपयश आहे का...?

फेरमतदान हे शासनाचे अपयश आहे का…?

कळंब : सतीश टोणगे

लोकसभेच्या निवडणुका संपल्या. अठरावी लोकसभा येण्यासाठी काही दिवसांचा अवधी आहे. आता गावोगाव विजयी कोण?.. गावात कोणाला लीड मिळणार? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, शर्यती लावल्या जात आहेत. कुणाच्या गावात कोणाला लीड मिळणार याची आकडेमोड सुरू असतानाच ब-याच ठिकाणी कमी-जास्त मतदान झाले, त्यामुळे अनेक गावे व मतदान केंद्रे संशयाच्या फे-यात अडकले आहेत. त्यात सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, बीड लोकसभा मतदारसंघात येथे कांटे की टक्कर झाली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांचा हा बालेकिल्ला. येथे निवडणुकीत जादूची कांडी फिरवली जायची, अशी चर्चा असायची. यावेळी भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत होत आहे. मराठा आरक्षणाचे पडसाद या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले.

मतदाना दिवशी पोलिसांचा मोठा फौजफाटा या जिल्ह्यात तैनात असतानाही, भाजपच्या व धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील मतदानाचे केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच अनेकांनी करून काही भागात फेरमतदान घेण्याची मागणी लावून धरली आहे. जर फेरमतदान झाले तर हे शासनाचे अपयश समजायचे काय..!

बीड जिल्ह्यातील परळी हा मतदारसंघ विद्यमान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला. या जिल्ह्यात जातीय समीकरणे असल्याने व परळी हा गड राखण्यासाठी केंद्रे ताब्यात घेतल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी करून निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. राज्यातील गृह विभाग झोपेत आहे काय? असा प्रश्न मतदार विचारत आहेत. दररोज काही ना काही प्रकार घडत असताना गृहमंत्री मात्र सारवासारव करताना दिसत आहेत.

प्रशासनावर वचक न राहिल्याने अनेक प्रकार घडू लागले आहेत. राज्यातील बीड जिल्ह्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. मोठा पोलिस बंदोबस्त असताना त्यांच्यासमोर अनेक प्रकार घडत आहेत व घडले आहेत. त्यामुळे हे सर्व सत्ताधा-यांबरोबर मॅनेज असल्याची चर्चा होत आहे. यामुळे राज्याच्या बदनामीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR