लातूर : प्रतिनिधी
लातूर नगर पथ विक्रेता समिती, लातूर शहर वाहतूक नियंत्रण पोलीस व लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेले शहरातील हॉकर्स झोन हे कायम असतानासुद्धा मनपा प्रशासन फेरिवाल्याविरुद्ध करीत असलेली एकतर्फी कारवाई चुकीची तसेच बेकायदेशीर आहे. मनपा प्रशासन नगर पथ समितीला विश्वासात घेत नाही, असा आरोपही लातूर नगर पथविक्रेतो समितीने केला असून याबाबतचे निवेदन मनपा आयुक्तांना समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या १५-२० दिवसांपासून शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, फेरिवाल्यांवर कारवाई करुन बाजारपेठेतून त्यांना हुसकावून लावले जात आहे. यामुळे भाजीपाला, फळ विक्रेते, फेरिवाले विरुद्ध महानगरपालिका प्रशासन, असा संघर्ष होत असतानाचा आता या संघर्षात लातूर नगर पथ विक्रेता समितीने उडी घेतली आहे. या समितीने महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. महानगरपालिका प्रशासनाने जो आठवडी बाजाराचा निर्णय घेतला तो निर्णय नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या दृष्टीने
गैरसोयीचा आहे आणि हा निर्णय गैर आहे.
लातूर शहर नगर पथ विक्रेता समितीच्या पहिल्या बैठकीत गंज गोलाई भागातील मस्जिद रोड हा हॉकर्स झोन असतानासुद्धा महानगरपालिका प्रशासनाने या रोडवर अन्यायकारक कारवाई केली आहे. ही कारवाई तातडीने थांबविण्यात यावी. दयानंद गेट, उषा-किरण बार्शी रोड भागातील पथविक्रेता समितीने तेथील व्यावसायिकांना जोपर्यंत पर्यायी जागा उपलब्ध करुन देत नाहीत तोपर्यंत त्यांना रोडच्या एका बाजूने व्यवसाय करु द्यावा, असे ठरलेले असतानासुद्धा मनपा प्रशासनाने त्याही ठिकाणी एकतर्फी कारवाई करीत असून ही कारवाई थांबविण्यात यावी, असेही मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात लातूर शहर नगर पथ विक्रेता समितीने नमुद केले आहे.
या निवेदनावर लातूर शहर नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य गौस गोलंदाज, त्र्यंबक स्वामी, मनोज शिंदे, मज्जीद बागवान, उषा धावारे, वैशाली पडवळ, दीपमाला तुपकर यांच्या स्वाक्ष-या आहेत. या सर्वांनी मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची दि. १७ फेब्रुवारी रोजी भेट घेऊन सदर निवेदन दिले.