सॅन्फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
फेसबुकच्या सांस्कृतिक प्रभावात होणारी घट आणि त्याच्या भविष्यातील संधीबद्दल मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी चिंता व्यक्त केली आहे.
२०२२ च्या एप्रिलमध्ये झुकेरबर्ग आणि फेसबुकचे प्रमुख टॉम ऍलिसन यांच्यात ईमेल्सद्वारे झालेल्या संवादामध्ये, फेसबुकचे स्थान आणि युजरच्या वर्तनात होणा-या बदलांबद्दल गंभीर चर्चा झाली. हे ईमेल्स सध्या अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनच्या अँटी ट्रस्ट कारवाईच्या संदर्भात कोर्टात सादर करण्यात आले आहेत. यामध्ये झुकेरबर्ग यांनी फेसबुकचे युजर्स अजूनही सक्रिय असले तरी पूर्वीचा सांस्कृतिक प्रभाव दिसत नाही, त्यामुळे फेसबुकच्या भविष्याबद्दल प्रश्न उभे राहिल्याचे म्हटले आहे.
झुकेरबर्ग यांच्या मते, फेसबुकवर असलेल्या मित्र यादीचे ‘फ्रेंडिंग’ मॉडेल आता जुने झाले आहे. आजकाल अनेक युजर्सचे फ्रेंड्स नेटवर्क हे त्यांच्या ताज्या आणि वैयक्तिक आवडींशी संबंधित नाही. अनेक युजर्सची फ्रेंड लिस्ट अधिकतर अशा मित्रांनी भरलेली आहे की ज्यांना ते खरोखर ऐकू इच्छित नाहीत किंवा ज्यांच्याशी ते सुसंगत राहू इच्छित नाहीत.
झुकेरबर्ग यांना हे देखील जाणवले की, पारंपारिक ‘फ्रेंडिंग’ मॉडेल जरी फेसबुकवर सक्रियता आणत असले तरी, त्याच्या सध्याच्या पद्धतीला काहीतरी नवीन आणि आधुनिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. झुकेरबर्ग यांच्या या चिंतेचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे फेसबुकचे बदलते स्थान आणि युजर्सचे वर्तन. फेसबुक अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, पण त्याचा सांस्कृतिक प्रभाव कमी होत चालला आहे. झुकेरबर्ग यांचा मुख्य दृष्टिकोन असाच आहे की, फेसबुकला बदलत्या काळानुसार स्वत:ला सुधारणे आणि आधुनिकता स्वीकारणे आवश्यक आहे.
मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकला एका नवीन आणि आधुनिक दिशेने नेण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये ‘फ्रेंडिंग’ मॉडेलला मागे टाकून ‘फॉलोईंग’साठी अधिक जागा दिली जाऊ शकते.