बर्लिन : वृत्तसंस्था
ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीत सारेकाही आलबेल नाही, याचे संकेत मिळू लागले आहेत. फोक्सवॅगन या सर्वात मोठ्या कंपनीने भारतात २ अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक करूनही यश आलेले नसताना मूळ देश जर्मनीतून खळबळजनक वृत्त आले आहे.
मुळ कंपनी तिचे ब्रँड स्कोडा, सीट आणि ऑडी या उपकंपन्यांच्याही मागे पडली आहे. २०२३ मध्ये जाहीर केलेल्या कपातीच्या धोरणानुसार २०२६ पर्यंत १० अब्ज युरोची बचत होणार आहे.
मुळची जर्मनीची कंपनी असलेली फोक्सवॅगन मेटाकुटीला आली आहे. यामुळे आपल्याच देशातील प्रकल्प बंद करण्याची वेळ कंपनीवर आली असून कर्मचा-यांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनी जर्मनीतील प्रकल्प बंद करण्याचा विचार करत असल्याचे कंपनीचे सीईओ ऑलिव्हर ब्लुमे यांनी म्हटले आहे.
याचबरोबर कंपनीने १९९४ पासून कर्मचा-यांना नोकरीची दिलेली हमी (जॉब सिक्युरिटी प्रोग्राम) संपुष्टात आणत असल्याचे जाहीर केले. कंपनीच्या आर्थिक सुधारणेसाठी सेवानिवृत्तीच्या जवळ असलेल्या कर्मचा-यांना कमी करणेच पुरेसे नसल्याचे कंपनीच्या मंडळाने म्हटले आहे.