नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कॅबिनेट ऑन सिक्युरिटीने भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल मरीन फायटर जेट खरेदी करण्याच्या ६३ हजार कोटींच्या मेगा डीलला मंजुरी दिली. या डीलवर लवकरच अंतिम मोहर लागणार असून त्यानंतर नौदलाला ही मरीन राफेल मिळणार आहेत. भारताला प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे. चीनचे एकीकडे समुद्रात प्राबल्य वाढत असताना ही डील झाली आहे. त्यामुळे या नव्या मरीन राफेलने नौदलाची ताकद कैक पटींनी वाढणार आहे.
या कराराप्रमाणे नौदलाला फ्रान्सची अत्याधुनिक २२ सिंगल सिटर आणि ४ ट्वीन सिटर राफेल मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. या लढाऊ विमानांना विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात केली जाणार आहेत. कॅबिनेट मंजुरी दिल्याच्या निर्णयानंतर आता संरक्षण मंत्रालय फ्रान्स सरकारशी कराराला अंतिम स्वरुप आणण्यासाठी अंतिम बोलणी करणार आहेत आणि कराराची इतर प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
या कराराचा एक भाग म्हणून यातील जेटची देखभाल, लॉजिस्टीक सपोर्ट, नौदलाच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण आणि भारतात तयार होणारा काही भाग यासाठी तांत्रिक सहकार्य या करारात समाविष्ट केले आहे. या डीलनुसार भारतीय नौदलाच्या जवानांना राफेल मरीन उड्डाण आणि देखभालीचे देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राफेल मरीन जेटची पहिली डिलिव्हरी २०२९ पर्यंत सुरु होऊ शकते. २०३१ पर्यंत सर्व २६ जेट भारतीय नौदलाना मिळणार आहेत.
हे फायटर मरीन जेट आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतसारख्या विमानवाहू नौकावर तैनात केले जाणार आहेत. ही जेट फायटर जुन्या झालेल्या मिग-२९ या लढावू विमानांची जागा घेणार आहेत. राफेल मरीन जेट लढाऊ विमानांना खास विमानवाहू नौकांवरून उड्डाण घेणे आणि लँडिंग घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात मजबूत लँडिंग गिअर, अरेस्टर हुक्स आणि एसटीओबीएआर तंत्रज्ञान (जे विमान कमी धावपट्टीवरून वेगाने टेक ऑफ आणि लँडिंग घेण्यात मदत करते) या करारामुळे भारतीय नौदलाला जादा ताकद मिळणार आहे.
अॅडव्हान्स मिसाईल वाहून नेण्यास सक्षम
भारतीय नौदलासाठी राफेल मरीन हे जेट फायटर खास करुन समुद्री गरजांनुसार तयार केले आहे. हे जेट मेटियोर, एक्सोसेट आणि एससीएएलपीसारख्या खतरनाक आणि अॅडव्हान्स मिसाईल वाहून नेण्यात सक्षम आहे. यामुळे युद्धातील क्षमता खूपच संहारक होणार आहे.