पूर्णा : प्रतिनिधी
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या तालुक्यातील मौजे चांगेफळ येथील एका ४२ वर्षीय शेतक-याचे कॅश काउंटरवर ठेवलेले १ लाख ९० हजार रुपये अज्ञात चोरट्याने परस्पर लांबवल्याची घटना बुधवार ता. ९ एप्रिल रोजी घडल्याचे उघडली झाले आहे. या प्रकरणी पूर्णा पोलिसांत घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील चांगेफळ येथील रहिवासी असलेले देवराव मारोतराव बुलंगे यांचे पूर्णा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे.ता.९ एप्रिल बुधवारी ते एका नातेवाईकांना पैसे द्यायचे असल्याने ते बँक खात्यावरील रक्कम काढण्यासाठी दुपारी बँकेत आले होते. दरम्यान तत्पूर्वी त्यांनी आपल्या शेतातून निघालेली तूर बाजार समितीच्या आवारातील बोकारे ट्रेडिंग कंपनी यांना विक्री केली होती.
विक्रीतून आलेले १ लाख ५० हजार रुपये तसेच अन्य एकाकडून हात उसने घेतलेले चाळीस हजार रुपये असे एकूण १ लाख ९० हजार रुपये घेऊन ते येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेले. दरम्यान खात्यावरील रक्कम काढण्यासाठी चेक लिहीत असताना. त्यांच्याजवळ पिशवीत असलेले १ लाख ९० हजार रुपये एका पिशवी ठेवलेले होते. त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या एका अज्ञात चोरट्याचा त्यावर बहुदा डोळा असावा त्या पिशवी वर त्याच्या जवळील पिशवी झाकून अलगदपणे त्यांचे पैसे लांबवले. हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून, चोरटा पिशवी खाली पिशवी लपवून पैसे घेऊन जात असताना स्पष्ट दिसत आहे.
घटनेची माहिती शाखा अधिकारी यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक विलास गोबाडे,अण्णा माने, मंगेश झुकटे, टाकरस शेमेवाड यांनी शाखेत येऊन सीसीटीव्हीची पाहणी केली व चोराच्या शोधासाठी पथकं रवाना केली असल्याचे सांगितले. शहरातील गजबजलेल्या नॅशनलाईज स्टेट बँकेमध्ये हा प्रकार घडल्याने ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे चोरट्यांना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे बँकेत सुरक्षा वाढवण्याची मागणी ग्राहकातून होत आहे
मुख्य कार्यालयाकडे सुरक्षा रक्षकाची मागणी : एसबीआय बँकचे शाखा अधिकारी
बँक व बँक परिसरामध्ये अलीकडे चोरीच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही मुख्य कार्यालयाकडे सुरक्षा रक्षकाची मागणी केली आहे. तसेच पोलीस प्रशासनाला पोलीस बीट नियमितपणे मेंटेन करण्याची विनंती करत पत्र देण्यात आले आहे. यासोबतच बँकेत दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: पूर्णा शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असल्यामुळे मोठी गर्दी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर बँकेच्या कर्मचा-यांची संख्या वाढवावी, अशी विनंती वरिष्ठ अधिका-यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. स्टाफ वाढल्यास ग्राहक सेवा अधिक सुरळीतपणे व वेगाने दिली जाऊ शकते, तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल अशी प्रतिक्रिया एसबीआय बँकचे शाखा अधिकारी अमितकुमार जोंधळे यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली.