लातूर : प्रतिनिधी
उत्कृष्ट सेवेसाठी ओळखल्या जाणा-या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ग्राहक सेवेचे बारा वाजलेले आहेत. त्यामुळेच ‘ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र फेडरेशन’ या ‘एआयबीईए’ शी संलग्न असलेल्या संघटनेने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकर भरती या प्रमुख मागणीसाठी २० मार्च २०२५ रोजी संपाची हाक दिली असल्याचे बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने निवेदने, धरणे आंदोलने, निदर्शने तसेच अनेक वेळा संप करून सुद्धा आवश्यक तितक्या प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सर्व संवर्गात नोकर भरती होत नाही. यांना बँकेच्या उच्च परंपरा,बँकेचे मालक असलेली जनता आणि ग्राहकांचे होणारे हाल, अपु-या कर्मचारी, अधिकारीवर्गामुळे त्यांच्यावरील तणाव याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे यापुढील काळात महाराष्ट्र बँकेतील संघटनेस बेमुदत संप सुद्धा करावा लागला तर त्यास जबाबदार बँकेचे चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा महाबँक कर्मचा-यांचे राष्ट्रीय नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिला.
लातूर येथे बँकेत एक दिवसाचा इशारा संप लातूर शहरात कर्मचा-यांनी निदर्शने करून पूर्ण यशस्वी केला. त्यावेळी निदर्शक बँक कर्मचा-यापुढे बोलताना पुढे ते म्हणाले की, अपु-या कर्मचारी अधिकारी संख्येचा विपरीत तात्काळ परिणाम ग्राहक सेवेवर होताना दिसून येतो आहे. ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत रांगेत उभारावे लागत आहे. बँक गेली अनेक वर्षे प्रचंड नफा कमावून उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, मग या नफ्याच्या बदल्यात ज्या ग्राहकांच्या जीवावर हा नफा कमावला जातो, त्या ग्राहकांना निकृष्ट सेवा देण्याचे दुष्ट धोरण, शोषण करणारे धोरण बँक व्यवस्थापनाने अवलंबीणे, हा ग्राहकांचा अवमान आणि कृतघ्नपणा आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या आजारपणासाठी, प्रमुख सांसारिक व आवश्यक गरजांसाठी रजा मिळत नाहीत. अनेक शाखांमध्ये शिपाई नाहीत. त्यामुळे तेथील शिपायांची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जातात, जे ग्राहकांच्या ठेवीदारांना धोकादायक आहे. मागील दहा वर्षांत अनेक नवीन शाखा उघडल्या गेल्या व बँकेचा व्यवसायही अनेक पटींनी वाढलेला आहे परंतु कर्मचा-यांची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येते आहे. ऑल इंडिया फेडरेशनने तात्काळ नोकरभरतीची मागणी केलेली आहे त्यासाठी आजचा संप अटळ बनल्याचेही कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी बँकेच्या मिनी मार्केट येथील लातूर मुख्य शाखेसमोर जमून जिल्हाभरातील ५० ते ६० कर्मचा-यांनी हातात मागणी फलक घेऊन व मुजोर व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणा देऊन दणदणीत संप साजरा केला. यावेळी कर्मचा-यांचे नेते कॉ. महेश घोडके, कॉ. उदय मोरे, कॉ. प्रकाश जोशी, कॉ. बालाजी मुळजे, महिला कर्मचारी नेत्या कॉ. रेश्मा भवरे, कॉ. संजीवनी गोजमगुंडे, कॉ. ऐश्वर्या उदावंत यासह जिल्हाभरातून सर्व कर्मचारी उपस्थित होते. आज बँकेच्या जिल्ह्यातील सर्व १५ शाखांचे कामकाज ठप्प होते. यावेळी इतर बँकेतील कर्मचारी संघटनांनी प्रत्यक्ष येऊन या संपास पाठिंबा व्यक्त केला.
बँक व्यवस्थापनाचा मनमानी कारभार : कॉ. दीपक माने
बँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने बँक चालवू पाहत आहे. संघटनांसोबत केलेल्या करारांचे पालन बँकेकडून केले जात नाही. संघटनांचे ताब्यात घेतलेले ऑफिसेस सुद्धा बँकेच्या व्यवस्थापनाकडून संघटनांना परत दिले जात नाहीत. त्यामुळे एकूणच या मनमानी, दादागिरी व हुकूमशाही कारभाराविरोधात संघटनांनी आजचा संप पुकारल्याचे सेक्रेटरी कॉ. दीपक माने यांनी सांगितले. आजचा संप ही व्यवस्थापनाच्या दादागिरी, मनमानीविरोधात व नोकर भरतीच्या प्रमुख मागण्यांसाठी होऊ घातलेल्या संघर्षाची सुरुवात असल्याचे व येथून हा लढा आणखी तीव्र बनत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तम ग्राहक सेवेसाठी नोकर भरती या प्रमुख मागणीसाठी करीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील या संपास ग्राहकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष कॉ. उत्तम होळीकर यांनी केले.