लातूर : प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बँक कर्मचा-यांच्या अनेक मागण्या घेऊन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स च्या वतीने संपूर्ण देशभरातील प्रमुख शहरांमध्ये दिनांक १४ फेब्रुवारी रोजी निदर्शने आयोजित केलेली होती. याचाच एक भाग म्हणून लातूर शहरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या मिनी मार्केट शाखेसमोर सर्व बँक कर्मचा-यांनी निदर्शने केली.
बँकेत वाढत असलेला कामाचा ताण पाहता व बँकेच्या नवीन उघडत असलेल्या अनेक शाखा याचा विचार करता बँकांमधून पुरेशी नोकर भरती करण्याची गरज आहे. अपु-या कर्मचारी संख्येमुळे ग्राहक सेवेवरती सुद्धा याचा परिणाम होत आहे. असे असतानाही अनेक वेळा संप, निदर्शने व आंदोलने करून सुद्धा सरकार बँकांमधून सर्व प्रवर्गात पुरेशी नोकर भरती करीत नाही. राज्य शासन, रिझर्व बँक, एलआयसी तसेच केंद्र सरकारच्या अनेक खात्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू आहे.
सरकार हे सांगत आहे की भारतात डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. असे असतानाही अनेक वेळा मागणी करूनही सरकारने बँकांना पाच दिवसांचा आठवडा लागू केलेला नाही. सरकार एकीकडे जन-धन, मुद्रा, पंतप्रधान आवास योजना, सामाजिकदृष्टयÞा दुर्बल घटकांसाठीच्या विमा योजना आणि रोजगार हमी योजना या योजनांच्या अनुदानाचे वाटप करण्यासाठी बँकांना वापरून घेते परंतु या योजना ज्यांच्यामार्फत राबविल्या जातात त्या कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मात्र ते मान्य करत नाहीत असे दिसत आहे. प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी युनायटेड फोरमने आंदोलनाची मालिका १४ फेब्रुवारीपासून सुरू केली असून यामध्ये ठीक ठिकाणी निदर्शने, सोशल मीडिया कॅम्पेन, संसदेसमोर धरणे व २४-२५ मार्च रोजी संप असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, असे बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी लातूरमध्ये विविध संघटनांचे १०० पेक्षा अधिक सभासद उपस्थित होते. यावेळी एसबीआयओएचे कॉ. उमेश आडगावकर, कॉ. बालाजी बावलगे, ए.आय.बी.ओ.ए.चे कॉ. विवेक पदरे, एन.सी.बी.इ. चे कॉ. अभिषेक बाहेती, महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी व अधिका-यांचे कॉ. राहुल सावंत तसेच नोबो चे कॉ. कैलाश कछवे या सर्वांनी उपस्थित समुदायाला याप्रसंगी मार्गदर्शन केले. सदरील निदर्शने कार्यक्रमास कॉ सदाशिव मुगावे, कॉ सचिन नंदागवळे, कॉ स्वप्निल जाधव, कॉ नरसिंग कुलकर्णी, कॉ रोहन गरजे, कॉ रेश्मा भवरे, कॉ. सरिता यासह सर्व बँकांमधून अनेक कर्मचारी व निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.