बंगळुरू : वृत्तसंस्था
भारताचे आयटी हब असलेल्या बंगळुरू शहरात आता ड्रोनद्वारे डिलिव्हरी सेवा देण्यात येत आहे. हायपरलोकल ड्रोन डिलिव्हरी नेटवर्क असलेल्या स्काय एअर या कंपनीने केवळ ७ मिनिटांत ड्रोनद्वारे डिलिव्हरी सुरू केली आहे.
या सेवेमुळे गुरुग्रामनंतर भारतातील ड्रोन लॉजिस्टिक्सचा स्वीकार करणारे बंगळुरू हे देशातील दुसरे शहर ठरले आहे. ही नवीन सेवा ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स क्षेत्रात मोठा बदल घडवून आणेल, असा दावा कंपनीने केला आहे.
ही देशव्यापी बदलाची सुरुवात आहे. आगामी काळात ड्रोन डिलिव्हरी एक सामान्य गोष्ट होईल. ही सेवा स्काय शिप वन या फ्लॅगशिप डिलिव्हरी ड्रोनच्या सहकार्याने सुरू आहे. हे ड्रोन १० किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकते. आणि ते १२० मीटर उंचीवरील अदृश्य ‘स्काय टनेल’ मार्गाचा वापर करेल. अर्थातच ट्रॅफिक टाळल्याने डिलिव्हरीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो.
गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर, ड्रोन २० मीटर उंचीवरून ‘स्काय विन्च’ प्रणालीद्वारे पार्सल खाली सोडतो आणि डिलिव्हरी पूर्ण झाल्यावर त्याच मार्गाने परत जातो. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ ७ मिनिटांत पूर्ण होते. स्काय एअरच्या ग्राहकांमध्ये ब्लू डार्ट, डीटीडीसी, शिपरॉकेट आणि ईकॉम एक्सप्रेस यांचा समावेश आहे. सध्या कंपनी ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स शिपमेंट हाताळते, तसेच लवकरच फूड डिलिव्हरी सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.
ड्रोन डिलिव्हरीचे फायदे
सध्या, प्रत्येक ड्रोन डिलिव्हरीमुळे ५२० ग्रॅम कार्बन उत्सर्जन वाचते. जो रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूक आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शाश्वत उपाय आहे. जर हे तंत्रज्ञान १०० पेक्षा जास्त मार्गांवर लागू केले तर दरवर्षी ३१०० मेट्रिक टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन घटेल. जे एकप्रकारे १.५ लाख झाडे लावण्याइतके परिणामकारक असेल.